भारत दौऱ्यावर असलेली बांगलादेश टीम 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम सामना 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
त्यानंतर उभयसंघात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. या टी 20 मालिकेकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. टी 20I साीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती भारतीय संघ कधी जाहीर करणार? आणि कुणाला संधी देणार? याबाबत साऱ्यांना उत्सूकता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही अद्याप टी 20I मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. बांगलादेश टीम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतेय. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाची यंग ब्रिगेड बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
उभयसंघातील तिन्ही सामने अनुक्रमे ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहेत. तिन्ही सामने हे 2 दिवसांच्या अंतराने खेळवण्यात येणार आहेत. सलामीचा सामना हा 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर येथील माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दुसरा सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे 9 ऑक्टोबरला आयोजित केला गेला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 12 सप्टेंबरला हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. तिन्ही सामन्यांची सुरुवात संध्याकाळी 7 वाजता होईल. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. उभयसंघात जून 2024 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचा टी 20 वर्ल्ड कप सामना झाला होता. तेव्हा टीम इंडियाने बांगलादेशवर 50 धावांनी सहज विजय मिळवला होता.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
आकडे काय सांगतात?
दरम्यान टीम इंडिया टी 20I मालिकेत बांगलादेशवर वरचढ ठरली आहे. भारता विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 14 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 14 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला एकमेव सामना जिंकता आलेला आहे. त्यामुळे आकड्यांबाबतही टीम इंडियाच बांगलादेशवर वरचढ असल्याच सिद्ध होतं.