संगीन मस्जिद इनाम जमिनीच्या विरोधात कटकारस्थान करणारे ते 24 जण कोण?
तत्कालीन वक्फबोर्ड सीईओ बीडचे तत्कालीन जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांच्या तडकाफडकी बदलीचे रहस्य काय?
अंबाजोगाई तालुक्यातील संगीन मस्जिद इनामी जमिनीचे चक्रव्यूह भेदण्यासाठी सीबीआय चौकशीची अत्यंत गरज
तत्कालीन पोलीस अधीक्षकांना संगीन मस्जिद इनामी जमीन प्रकरणी पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी गुन्हा दाखल करू नये असे पत्र का काढण्यात आले? भयंकर पोलखोल होण्याची शक्यता
संगीन मस्जिद इनामी जमिनीच्या पाठोपाठ अंबाजोगाई येथील जामा मस्जिदच्या इनामी जमिनीतही मोठा घोळ घातल्याचा संशय, लवकरच दिव्य आधार करणार मोठी पोलखोल
संगीन मस्जिद इनामी जमिनीची खरेदी-विक्री करणार्या त्या 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तत्कालीन सीईओ यांनी परवानगीही दिली होती, जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी फिर्यादही नोंद केली होती तर मग हे प्रकरण का दडपण्यात आले?
दोनशे एक्करपेक्षा जास्त जमिनीची खरेदी-विक्री झाल्याचा संशय, तब्बल 600 कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची शंका, सीबीआय चौकशीत अनेक मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता
अंबाजोगाई येथील संगीन मस्जिदच्या इनामी जागेची नोंद आजही वक्फ गॅझेटमध्ये, सदरील जमीन खिदमत माश, इनामी जमीन असल्याचा सातबारा व इतर कागदपत्रात स्पष्ट नमूद, जोपर्यंत वक्फबोर्डच्या गॅझेटमध्ये या जमिनीची नोंद तोपर्यंत या जमिनीचा खालसाच होत नाही, तसेच कोणी खरेदी-विक्रीही करू शकत नाही तर मग खालसा झाला कसा? बनावट कागदपत्राच्या आधारे षडयंत्र केल्याचे चित्र
वक्फबोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्यावर्षी याप्रकरणी गुन्हे दाखल करू नका म्हणून पत्र काढले होते, त्या पत्रात त्यांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याचा उल्लेख केला होता तर मग त्या चौकशीचे काय झाले? वक्फबोर्ड सीईओ यांनी पोलीसांकडून त्या चौकशीचा अहवाल नंतर मागून का घेतला नाही?
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संगीन मस्जिदची फाईल पुन्हा ओपन करण्याची गरज, याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर एसआयटी चौकशी सुरू होती, उपविभागीय पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत होते तर मग चौकशी अहवाल गेला कुठे?
बीड :
बीड जिल्ह्यात पंधरा हजार एक्करपेक्षा जास्त इनामी जमीन आहे. मध्यंतरी अनेक जमिनीचे बोगस खालसा करून या जमिनीची खरेदी-विक्री झाली होती. याप्रकरणी ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमातून मोठी पोलखोल करत बोगस खालसा झालेल्या इनामी जमिनी बोगस खालसामुक्त करून देण्यात आल्या होत्या. यात अनेक अधिकारी-कर्मचारी, तलाठी, मंडळाधिकारी यांच्यावर कारवाईही झाली होती. अनेक जमिनी बोगस खालसामुक्त झालेल्या असल्या तरी अनेक जमिनी आजही बोगस खालसा झालेल्या दिसून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील संगीन मस्जिदची एकुण इनामी जमीन 276 एक्करपेक्षा जास्त आहे. या जमिनीची वक्फ संस्थेत नोंद महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात असून सदरील जमिनीचे एकूण 10 सर्वे नंबर आहेत. ही जमीन खिदतमतमाश असतानाही या जमिनीला मदतमाश ठरवून या 276 एक्कर जमिनीपैकी अंदाजे 200 एक्करपेक्षा जास्त जमिनीचा बोगस खालसा करून सदरील जमीनीची खरेदी-विक्री केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी तत्कालीन बीडचे जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी विशेष लक्ष दिल्यानंतर ही सदरील जमीन अवैधरित्या खालसा झाल्याचे त्यांच्या निदर्शणास आल्यानंतर वक्फबोर्ड अधिकारी यांनी वक्फबोर्डचे तत्कालीन सीईओ यांच्याकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती. तसेच याप्रकरणात एका व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची सीआयटी चौकशीही सुरू होती. तत्कालीन सीईओ यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रोत्साहनही दिले होते. त्याअनुषंगाने बीडचे तत्कालीन जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी फिर्यादही नोंद केली होती. परंतु अचानकच या प्रकरणाकडे लक्ष देणार्या अधिकार्यांचे बदलीसत्र सुरू झाले आणि तत्कालीन सीईओ व बीडचे तत्कालीन जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांच्याकडील चार्ज काढून घेण्यात आला. त्यानंतर मात्र ही चौकशी गुलदस्त्यात अडकली. आता याप्रकरणाची फाईल पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पुन्हा ओपन करण्याची गरज असून तक्रारदाराच्या तक्रारीवरून याप्रकरणी जी सीआयटी चौकशी सुरू होती त्या चौकशीचे नेमके काय झाले? याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष दिले तर मोठी पोलखोल होण्याची शक्यता असून एकंदरीत 200 एक्करपेक्षा जास्त इनामी जमिनीचा हा प्रश्न असून यातून अंदाजे सहाशे कोटी रुपयांची खरेदी-विक्री होवून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा जोरात असून याप्रकरणी सीबीआय चौकशीची अत्यंत गरज आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील संगीन मस्जिद इनामी जमिन खिदमतमाश असून आजही गॅझेटमध्ये या जमिनीची नोंद आहे. सदरील जमीन खिदमतमाश असताना त्या जमिनीला मदतमाश दाखवून या जमिनीचा तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी खालसा करून हे प्रकरण निकाली काढले होते. जमिनीचा खालसा झाल्यानंतर सदरील जमिनीची संबंधितांनी मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली. वक्फबोर्डच्या गॅझेटमध्ये ही जमिन खिदमतमाश असतानाही या जमिनीचा खालसा झालाच कसा? असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला असून संबंधितांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर या जमिनीचा खालसा केल्याचे दिसून येत असून याप्रकरणाची पारदर्शक चौकशी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सदरील जमीन 276 एक्कर 18 गुंठे असून यातील फक्त 18 ते 20 एक्कर जमीन सध्या शिल्लक राहिलेली दिसून येत आहे. उर्वरित सर्व जमिनीची खरेदी-विक्री झाली असून यातून सहाशे कोटीची उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी याप्रकरणी सीईओ यांच्या आदेशानंतर याप्रकरणी फिर्याद नोंद केली होती. या फिर्यादीत या जमिनीची खरेदी-विक्री करणारे 24 दोषींची नावेही नोंद होती. एकंदरीत या प्रकरणाला वाचा फुटत असतानाच आताचे वक्फबोर्ड सीईओ यांनी या प्रकरणी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे, जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल करणे योग्य ठरणार नाही असे कारण दाखवून गुन्हे दाखल करू नये म्हणून थांबविण्यात आले होते. ज्याअर्थी याप्रकरणाची सीआयटी चौकशी सुरू होती तर मग या चौकशीचे काय झाले? आताचे सीईओ यांनी या चौकशीसंदर्भात पुढे पाठपुरावा काय केला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होणार यात काही शंका नाही.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी फाईल ओपन करावी
बीड वक्फबोर्डचे तत्कालीन जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी 25 जानेवारी 2022 या साली बीड-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजले असून या फिर्यादीत तब्बल संगीन मस्जिद इनामी जमिनीचा बोगस खालसा करणारे व खरेदी-विक्री करणारे 24 लोकांची नावे नमूद होती. या तक्रारीनंतर आताचे वक्फबोर्ड सीईओ यांनी या प्रकरणी 20 जानेवारी 2023 या साली तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून या प्रकरणी गुन्हा दाखल करू नये असे पत्राद्वारे कळविले. सीईओ यांनी संगीन मस्जिद इनामी जमीन प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी हे एसआयटी चौकशी करत आहे असे कारण दाखवून याप्रकरणी गुन्हे दाखल करू नये असे सांगितले होते. ज्याअर्थी याप्रकरणी एसआयटी चौकशी सुरू होती तर मग या चौकशीचे काय झाले? यासाठी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी अंबाजोगाई संगीन मस्जिद इनामी जमीन प्रकरणाची पुन्हा फाईल ओपन करण्याची गरज वाटत आहे.
दोनशे एक्करपेक्षा जास्त जमिनीचा घोटाळा
सहाशे कोटीची उलाढाल, सीबीआय चौकशी अपेक्षित
अंबाजोगाई संगीन मस्जिदची इनामी जमीन दोनशे एक्करपेक्षा जास्त आहे. या जमिनीचा खालसा करून मोठ्या प्रमाणात याची खरेदी-विक्री झाल्याचे दिसून येत असून दोनशे एक्करपेक्षा जास्त जमिनीचा हा घोटाळा असल्याने तसेच सहाशे कोटी रुपयांची यात उलाढाल झाली असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याची अत्यंत गरज असून याप्रकरणी सीबीआय चौकशीच करावी अशी जनतेतून मागणीही होत आहे. तसेच याप्रकरणी तत्कालीन वक्फबोर्ड अधिकारी व तत्कालीन वक्फबोर्डचे सीईओ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. जर सीबीआय चौकशी झाली तर मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
संगीन मस्जिद इनामी जमीन पाठोपाठ जामा मस्जिद इनामी जमिनीचा गेम केल्याची चर्चा
अंबाजोगाई येथील संगीन मस्जिद इनामी जमिनीसंदर्भात सुरुवातीला तक्रार दाखल झाली. नंतर याप्रकरणाचे काय झाले? हे समजून आले नाही. याप्रकरणी आताचे सीईओ यांना व्हॉटस्अॅपवरून याप्रकरणी मेसेज पाठवून माहिती मागितली. त्याशिवाय याप्रकरणी त्यांच्या मोबाईलवरून कॉल करून विचारणा करण्याचा प्रयत्नही केला परंतु त्यांनी व्हॉटस्अॅप मेसेजचे व कॉल उचलून उत्तर दिले नाही. संगीन मस्जिद प्रकरण वादात असतानाच अंबाजोगाई येथील जामा मस्जिद इनामी जमिनीसंदर्भात मोठे षडयंत्र सुरू असल्याची माहिती मिळाली असून या जमिनीचाही बोगस खालसा करून खरेदी-विक्री करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. या जमिनीचा बोगस खालसा केला की बाँडच्या आधारावर जमीन विक्रीचा प्रयत्न आहे. याकडेही जिल्हा वक्फबोर्ड अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे वाटते.