मजूर व बेरोजगार तरुणांच्या आधार कार्ड, पॅन कार्डचा वापर,अनेक तरुण या षडयंत्रात अडकलेले
त्या गरीब तरुणांच्या नावाने जीएसटी खाते उघडल्याची त्यांना माहितीच नाही, भयंकर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता
शासनाच्या योजनांचा लाभ देतो म्हणून मजूरी करणार्या व बेरोजगार तरुणांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड घेवून गेम केल्याचे चित्र
बोगस जीएसटी खाते उघडून ट्रेडर्सच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बीडमध्ये उलाढाल झाल्याची इन्कम टॅक्स विभागाला माहिती मिळाल्यानंतर मोठी खळबळ
इन्कम टॅक्स विभागाकडून अनेक मजूर व बेरोजगार तरुणांची चौकशी, लवकरच मुख्य सुत्रधार टॅक्स विभागाच्या जाळ्यात अडकणार
असे बोगस जीएसटी खाते उघडून लाखो रुपयांचा टॅक्स बुडविल्याची शंका, मोठी साखळी सक्रीय असल्याचे चित्र, त्या ट्रेडर्स धारकांचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून शोध सुरू
बोगस जीएसटी क्रमांक प्रकरणी औरंगाबाद इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे पथक बीडमध्ये दाखल, कोट्यवधी रुपयांची उलाढाल केलेल्या व्यापार्यांची होणार सखोल चौकशी
त्या मजूर व बेरोजगार आधारकार्ड, पॅनकार्ड घेणारे कोण? ट्रेडर्सधारकांसाठी बोगस जीएसटी खाते उघडून देणारे कोण? सिमेंट व्यापारी, प्लॉटींगवाले, टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर
त्या बेरोजगार व मजूरी करणार्या तरुणांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला चौकशीकामी संपूर्ण मदत करण्याचे दिले आश्वासन, डिपार्टमेंटच्या अधिकार्यांनी त्या बेरोजगार तरुणांच्यासोबत दाखविली सहानूभुती, अशा तरुणांनी सावध राहण्याची गरज
बीड पंचायत समितीतही एमआरईजीएसच्या कामात बनावट जीएसटी खाते उघडून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने शासनाच्या योजनांकडेही लक्ष देण्याची गरज
बीड :
एमआरईजीएस अंतर्गत झालेल्या कामातून जीएसटी बुडविल्याची दिव्य आधारने यापूर्वी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. यात विशेष म्हणजे कामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बनावट बिलाचा वापर केल्याचाही दिव्य आधारच्या प्रतिनिधीने आरोप करत याप्रकरणी थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तक्रारी अर्ज देवून याप्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आतातर चक्क बनावट कागदपत्राच्या आधारावर जीएसटी खाते उघडून दिल्याचा प्रकार समोर आला असून बीडमधून अशा बनावट बोगस जीएसटी क्रमांकाच्या आधारावर लाखो रुपयांचे जीएसटी टॅक्स बुडविल्याचे दिसून येत आहे. सदरील बाब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या निदर्शणास आली असून याप्रकरणी औरंगाबाद इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे पथक बीडमध्ये दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. काही व्यापार्यांनी व्यापाराच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल केली. परंतु जीएसटी भरलाच नाही, ही बाब निदर्शणास आल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्या व्यापार्यांच्या जीएसटी क्रमांकावरून याप्रकरणी शोध सुरू केल्यानंतर सदरील खाते बनावट कागदपत्राच्या आधारावर तयार केल्याचे दिसून आले असून यात बेरोजगार तरुण व मजूरांच्या कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे. बनावट जीएसटी खाते उघडून देणारी टोळी बीडमध्ये सक्रीय झाली असल्याचे दिसून येत असून बनावट कागदपत्राच्या आधारावर जीएसटी क्रमांक मिळवून त्या आधारावर कोट्यवधीची उलाढाल करणार्या व्यापार्यांचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट शोध घेत आहे. विशेष म्हणजे त्या बेरोजगार तरुण व मजूरांना त्यांच्या नावावर जीएसटी क्रमांक सुरू झाला असल्याचेही त्यांना माहिती नसून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस आल्यानंतर अशा तरुणांची झोप उडाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनेही अशा तरुणांना सहानूभुती दाखवत याप्रकरणी मदत करण्यासंदर्भात सांगितले असून अशा बेरोजगार तरुण व मजूरांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला याकामी मदत करण्याचे आश्वासन दिले असून मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शहरातील काही तरुणांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून ज्या तरुणांना इन्कम टॅक्स काय? याची माहितीही नाही अशा तरुणांच्या नावावर लाखो रुपयांची जीएसटी थकीत असल्याचे दिसून येत असून यात काही ट्रेडर्स व प्लॉटींगचा व्यवसाय करणार्यांचा सहभाग असल्याचे दिसून येत असून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याप्रकरणी चौकशी करत आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील काही बेरोजगार तरुण व मजूरांना बीड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस प्राप्त झाली. या नोटीसच्या आधारावर त्या तरुणांना बीड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये बोलावण्यात आले. नेमका हा काय प्रकार आहे म्हणून तरुणांनी संबंधित विभागात जावून अधिकार्यांची भेट घेतली. संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट सांगितले की, तुमच्या नावाचे जीएसटी क्रमांक सुरू झालेले आहे. त्या क्रमांकाच्या आधारावर काही ट्रेडर्स सुरू असून यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याची संबंधित विभागातील अधिकार्यांनी त्या तरुणांना सांगितल्यानंतर ते तरुण हवालदिल झाले. नेमका हा काय प्रकार आहे हे त्यांना समजून येत नव्हते. दिवसभर राबराब मेहनत करणे तरच कुटुंबाची उपजिविका भागविली जाते तर मग कोट्यवधीची उलाढाल कोणी केली? असा प्रश्न उपस्थित झाला असून या तरुणांनी संबंधित विभागाला स्पष्ट सांगितले की, आमचा असा कोणताच व्यवसाय नाही, आम्ही मोलमजूरी करून आपली उपजिविका भागवितो, हा सर्व प्रकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्याही लक्षात आला. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या स्वाधीन करण्यात आले. येथील अधिकार्यांनी या बेरोजगार तरुण व मजूरांना नोटीस पाठवून औरंगाबाद येथील कार्यालयात बोलावले. त्यानंतर ते तरुण औरंगाबादच्याही कार्यालयात हजर झाले. त्या तरुणांची कसून चौकशी झाली, चौकशीअंती अधिकार्यांच्याही लक्षात आले की, या तरुणांचा वापर झाला असावा, त्यांच्याकडून काही लेखी पत्रव्यवहार करून त्या तरुणांना सोडण्यात आले. नेमका हा काय प्रकार आहे? याचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट शोध घेत असून या बेरोजगार तरुण व मजूरांच्या कागदपत्रांचा वापर करून सदरील जीएसटी क्रमांक उघडण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणांचे कागदपत्र घेवून त्यांच्या नावाने जीएसटी क्रमांक सुरू करणारे कोण? तसेच ट्रेडर्सच्या नावाने कोट्यवधीची उलाढाल करून लाखो रुपयांचा जीएसटी टॅक्स बुडविणारे कोण? याचा डिपार्टमेंट शोध घेत असून बनावट व बोगस जीएसटी क्रमांकाच्या आधारावर लाखो रुपयांचा टॅक्स बुडालेला असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
प्लॉटींगवाले आणि ट्रेडर्स व्यापारी रडारवर
बीडमधील ज्या मजूराच्या बनावट कागदपत्राच्या आधारावर जीएसटी क्रमांक उघडण्यात आले त्या नावावर एक ट्रेडर्स सुरू करण्यात आले होते. यातून मोठ्या प्रमाणात सिमेंटचा व्यापार करून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून येत असून लाखो रुपयांचा जीएसटी टॅक्स थकीत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या निदर्शणास आल्यानंतर संबंधित विभागाने जीएसटी क्रमांक ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्यांना नोटीस पाठविली. परंतु तो व्यक्ती मजूर निघाला. याचा अर्थ असा की, त्या मजूराचे कागदपत्र वापरून त्या नावाने जीएसटी क्रमांक सुरू करून खाते उघडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्या दृष्टीकोनातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चौकशी सुरू केली असून यात काही प्लॉटींगवाले, काही ट्रेडर्स व्यापारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर असून अशा व्यापार्यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीअंती मोठी खळबळ होणार हे मात्र खरे आहे.
शासकीय योजनांचा लाभ देतो म्हणून कागदपत्र घेणारे कोण?
सध्या शासनाच्या अनेक नवीन योजना कार्यरत झालेल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळावा म्हणून अनेक तरुण आणि मजूरवर्ग प्रयत्नात असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी हमखास आधारकार्ड, पॅनकार्ड असे कागदपत्रे लागतातच. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुणांनी शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी आपले आधारकार्ड व पॅनकार्ड एका व्यक्तीकडे दिले होते. त्यानंतरच अशाप्रकारे त्यांच्या नावाने जीएसटी क्रमांक सुरू झालेले आहेत. कदाचित त्या व्यक्तीने शासनाच्या योजनांचा लाभ देतो म्हणून या तरुणांच्या कागदपत्राचा वापर केला की काय? असाही प्रश्न उपस्थित होत असून यापुढे तरुणांनी व मजूरांनी आपले कागदपत्र देण्यापूर्वी सावध राहण्याची गरज आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्या व्यक्तीचाही शोध घेत असून जीएसटी खाते उघडून देणारेही यात दोषी ठरणार आहेत.
ते तरुण हवालदिल, त्यांची झोप उडाली
ज्या तरुणांनी कधी एक लाख रुपये एकत्रित पाहिले नाही, अशा तरुणांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लाखो रुपये जीएसटी टॅक्स थकीत असल्याची नोटीस आल्यानंतर ते तरुण हवालदिल झाले असून त्या तरुणांची झोप उडाली आहे. अशाप्रकारे शहरातील अनेक बेरोजगार तरुण व मजूरांच्या कागदपत्रांचा वापर करून बोगस जीएसटी क्रमांक सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात असून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बीडमध्ये सखोल चौकशी करत आहेत. तसेच या चौकशीकामी औरंगाबादचे पथकही बीडमध्ये दाखल झाले असून काही व्यापार्यांची चौकशीही सुरू असल्याचे समजले आहे.
शासनाच्या कामातूनही जीएसटीत बोगसगिरी
बीड पंचायत समितीमधून एमआरईजीएसची मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत. यात काही ग्रामपंचायतने ट्रेडर्समधून वाळू, मुरूम खरेदी केल्याचे बिले जोडली आहेत. तसेच विहिरीत ब्लास्टिंग करण्याचे साहित्य खरेदी झाल्याचीही बिले असून यातील काही बिलावरील जीएसटी क्रमांक संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. ज्याअर्थी ट्रेडर्सधारकांना वाळू, मुरूम विक्री करण्याचे अधिकारच नाहीत तर मग या ट्रेडर्सधारकांनी बिले कशी दिली? हा महत्त्वाचा प्रश्न असून काही ग्रामपंचायतीने ही बिले झेरॉक्स दुकानावर बसून संबंधित ट्रेडर्सधारकांच्या नावाचा वापर केल्याचीही चर्चा असून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने याप्रकरणी चौकशी करण्याची गरज आहे.