महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्यांचे राष्ट्रीयकृत, शेड्युल बँकेत खाते उघडण्याचे आदेश
दिव्य आधारच्या ग्राऊंड रिपोर्टींगची दखल, मुख्य अभियंता व इतर अधिकार्यांचे आभार
बीड । दिव्य रिपोर्टर
महावितरण कंपनीला एजन्सीमार्फत कंत्राटी कर्मचारी पुरवठा करण्यात येते. संबंधित एजन्सी त्या कर्मचर्यांना मिळालेला पगार पूर्ण देत नाही, तसेच कंत्राटी कर्मचार्यांचे खाते पिपल्स आणि अर्बन बँकेत उघडून संंबंधित एजन्सी कंत्राटी कर्मचार्यांच्या पगारात घोळ घालते. त्या अनुषंगाने दिव्य आधारच्या प्रतिनिधीने या तक्रारीची दखल घेत ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली होती. ग्राऊंड रिपोर्टींगच्या वृत्ताची दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कंत्राटी कर्मचार्यांचे खाते राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकेत उघडण्याचे आदेश दिले असून ग्राऊंड रिपोर्टींगची दखल घेतल्याबद्दल मुख्य अभियंता व इतर अधिकार्यांचे मोठे आभार.
सदरील कंत्राटी कर्मचार्याचे खाते राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकेत उघडण्यासाठी महावितरणने बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक आणि एचडीएफसी बँकेकडून कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोतद्वारे कार्यरत असलेल्या कामगारांना बँकेमार्फत वेतन खात्यावर काय सुविधा देण्यात येतील या बाबतची माहिती मागितली असता बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोतद्वारे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी वेतन खात्यावर विविध लाभ व सुविधा देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. कंत्राटी कामगारांना सदर बँकेमार्फत वेतन खात्यावर अजीवन विनामुल्य शुन्य शिल्लक खाते व्यक्तीगत अपघात सुरक्षा कव्हर, अपघाती मृत्यू झाल्यास विमाकवच, मोफत हवाई अपघाती मृत्यू संरक्षण, एटीएम व्यवहार मोफत आणि बँकेच्या एटीएमसाठी अमर्यादीत मोफत या सुविधेव्यतिरिक्त विविध अतिरिक्त सुविधा सेवा जसे की, विनामुल्य डेबिट, क्रेडीट कार्ड, नेट बँकींगवर मोफत एनईएफटी/आरटीजीएस, लॉकर्स, डी मॅट/ट्रेडिंग सुविधा इत्यादी प्रधान केल्या जातील. बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवरील इतर राष्ट्रीयकृत/शेड्युल बँकेमार्फत बाह्यस्त्रोतद्वारे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतन खात्यावर वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सुविधा प्रधान करीत असल्यास बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचार्यांच्या सोयीनुसार संबंधित बॅँकेत वेतनखाते उघडण्याबाबत मार्गदर्शन त्या परिपत्रकातून केलेले असून दिव्य आधारच्या ग्राऊंड रिपोर्टींगची ही दखल असल्याने मुख्य अभियंता व इतरअधिकार्यांचे मोठे आभार दिव्य आधारने व्यक्त केले आहेत.
सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना
सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांना कळविण्यात येते की, आपल्या अखत्यारितीत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे संबंधित कंत्राटदार एजन्सीमार्फत बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक तसेच स्थानिक पातळीवरील इतरही राष्ट्रीयकृत/ शेड्युल बँकेमार्फत वेतनखाते उघडण्याकरीता विभागीय कार्यालय स्तरावर कार्यालयाच्या आवारामध्ये शिबिराचे आयोजन करावे तसेच संबंधित बँकेमार्फत कंत्राटी कामगारांसाठी देवू केलेल्या सुविधा व योजनांचा लाभ कंत्राटदार संस्थेच्या अधिनस्त बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना मिळेल याबाबत कारवाई करावी असे त्या परिपत्रकात नोंद करण्यात आले आहे.
दोन महिन्याचा कालावधी लागणार
राज्यात हजारो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत, या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीयकृत, शेड्युल बँकेत खाते उघडण्यासंदर्भात परिपत्रक निघाले असले तरी, सर्व काही सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणारच आहे याची सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नोंद घेण्याची गरज असून दोन महिन्यात सर्व काही सुरळीत होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे